Thursday, 31 December 2015

ShivShaktiSangam‬ - Special Blog

#‎ShivShaktiSangam‬

लग्न झाल्या झाल्या सुरुवातीला मी त्याला नेहमी विचारायचे ‘इतक्या बैठका घेऊन काय करता नक्की? एवढासा छोटासा तर कार्यक्रम ! ठीक आहे ... आज काय दसरासंचलन, दिवाळी वर्ग, उद्या हिवाळी वर्ग मग संक्रांत, वार्षिक उत्सव, पाडवा, उन्हाळी वर्ग मग गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन ... पण मग पुढे काय? असं फक्त एकत्र येऊन काय करता?’ त्यानं कधी एकाजागी बसून मला ह्याची रेडीमेड उत्तरं दिली नाहीत. तो जमेल तसा संघाशी निगडीत राहिला आणि मलाही हळूहळू वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, भारतीय किसान संघ, मजदूर संघ, समिती, मुस्लीम राष्ट्रीय मंच ह्याबद्दल ओघाने समजत गेलं, कुठे कुठे वाचनात येत राहिलं.
मागच्या दहा वर्षात कितीतरी कार्यकर्ते, प्रचारक ह्यांच्या ओळखी होत गेल्या. हे लोक कसं आणि का काम करतात ह्याबाबत उत्सुकताही वाढत गेली आणि काही प्रश्नांची उत्तरंही कोणी न देता एक सामान्य नागरिक म्हणून समजत गेली. तरी कधी कधी ‘ह्या सगळ्याचं पुढे काय ?’ हा प्रश्न असायचाच.
मागच्या दहा वर्षात आपले बदललेले सण समारंभ, खासकरून जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि शिवजयंती, त्यावरून राजकारण, कर्णकर्कश्श संगीत आणि अनावश्यक झगमगाट ह्या गोष्टींमुळे सार्वजनिक उत्सवांचा उबग यायला लागलाय. पण मग विविधतेतून एकता साधण्यासाठी टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक उत्सवांची आवश्यकताही तेवढीच वाटते. पण मग त्यावर उपाय काय? हे विचारचक्र चालूच राहतं आणि संघाचे कार्यक्रम बघितले कि त्याची उत्तरं मिळत राहतात.
हे सगळं आत्ता आठवायचं कारण म्हणजे ३ जानेवारी २०१६ ला होणारा एक लाख स्वयंसेवकांच्या एकत्रिकरणाचा शिवशक्ती संगम हा कार्यक्रम. गेले कितीतरी दिवस मी कार्यकर्त्यांना अतिशय उत्साहाने संकल्पना राबवताना बघत आहे. संघाची शिस्तबद्धता हा कार्यक्रम राबवताना दिसत आहे आणि आपसूकच शिवशक्ती संगम का, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. कार्यकर्ते जोपासणे, जोडणे, समाजापर्यंत संघ पोहोचवणे ही त्यांची खास अशी उद्दिष्टे असतीलही, पण मला तरी सार्वजनिक उत्सवांमधून अपेक्षित असलेली एकता आणि संघभावनेने काम करण्याचे उत्तम उदाहरण म्हणून ह्या सोहळ्याचं विशेष कौतुक वाटत आहे.
मला व्यक्तिशः दहा लोकांना एकत्र करायचं ही गोष्टही अवघड वाटते आणि आज रोजी एक लाख एकसष्ठ हजारच्या वर स्वयंसेवकांनी कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. सुमारे लाखभर स्वयंसेवक आणि पन्नास हजार नागरिक उपस्थित असतील असा आधीच अंदाज होता. तेव्हापासून खूप उत्सुकता होती. जागा कुठली? सामान्य नागरिक कुठे बसणार? स्टेज किती मोठं? वेगवेगळ्या जिल्ह्या तालुक्यातून लोक येणार त्यांची व्यवस्था काय? जेवण पाण्याचं काय? आसन व्यवस्था कशी? (वर्गात २५ मुलांना रांगेत बसवायचं म्हटलं तर घसा दुखून जातो!) मग आखणी कशी करतात? किती जणांचा एक गट असतो? अनीकिनी प्रानीकिनी म्हणजे काय? प्रेक्षकांना सगळं दिसणार कसं? किती आणि कोण कोण येऊन गेले ह्याची नोंद कशी ठेवणार? सिद्धता केंद्र म्हणजे काय? पत्रकार कुठे असणार? शिदोरी कशासाठी? स्वच्छता कशी राखणार? ‘पर्यावरणपूरक’ म्हणता आहात, म्हणजे काय करणार? किती कॅमेरे असणार? ड्रोन कॅमेराने फोटो आणि शुटींग कसं करतात? सुरक्षेचं काय? वाहतूक कशी कंट्रोल करणार? काही आपत्ती आल्यास त्याचे काय?
हे झाले माझ्यासारख्या सामान्य माणसाचे प्रश्न! एवढा मोठा कार्यक्रम आपल्यासाठी तर अभूतपूर्वच! ह्याच उत्सुकतेपोटी मध्यंतरी कार्यक्रम स्थळी म्हणजे मारुन्जीला जाऊन आले. रस्त्याची, लेवलिंगची कामं बघितली. स्टेज, सिद्धता केंद्र होत होती, आखणी चालू होती. वाहनतळाची व्यवस्था कळली. नुसतं तीन मजली लिफ्ट असलेलं स्टेज बघितलं तरी भव्यतेची कल्पना येईल. आणि माझ्या सामान्य प्रश्नांव्यतिरिक्त कितीतरी गोष्टींचा सखोल विचार करून हा कार्यक्रम आखला आहे हे लक्षात येईल.
शांततापूर्ण मार्गाने नियोजन, व्यवस्थापन आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार, कामाची विभागणी, कार्यकर्त्यांची उतरंड, स्नेहपूर्ण वातावरणात होणारा कार्यक्रम, त्यायोगे साधली जाणारी 'आपण एक आहोत, संघटीत आहोत' ही भावना, वैयक्तिक आयुष्यात होत राहणारे मूल्यवर्धन आणि पर्यायाने घडत जाणारे तरुण आदर्श नागरिक आणि प्रखर राष्ट्रीयत्वाची भावना... ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला संघाव्यतिरिक्त आणि कोणत्याही व्यक्तिमत्व शिबिराशिवाय फ्री ऑफ कॉस्ट मिळणं अवघडच.
तीन तारखेला कार्यक्रमाला तर तुम्ही यालच. पण ख्रिस्मसच्या सुट्टीत कार्यक्रमाच्या आधी कार्यकर्त्यांचा उत्साह, समरसता, नियोजन आणि व्यवस्थापन बघण्याकरिता, आपल्या मुलांना स्वप्नातीत गोष्टींकरता उद्युक्त करण्याकरिता, मी गेले होते तसंच तुम्हीही आधी नक्की जाऊन या. ख्रिस्तमसचे दिवस असल्यामुळे रस्त्याने जागोजागी लाल टोप्या तर दिसत आहेतच. तसंच आपल्या मुलांना काळ्या टोपीचं कामही बघूद्या, आपणही बघूया.

- अॅड. सौ. विभावरी बिडवे

No comments:

Post a Comment