Thursday, 31 December 2015

ShivShaktiSangam - "याचि देही । याचि डोळा ।"

#‎ShivShaktiSangam‬


  !! शिवशक्ती वार्ता !!
"याचि देही । याचि डोळा ।"
* महाभारताचं युद्ध धृतराष्ट्राला पाहता आलं नाही. त्यानं 'संजया'करवी ते केवळ ऐकलं. आजच्या परिभाषेत लाईव्ह कॉमेंट्रीच म्हणायची ती. पण धृतराष्ट्राला ते प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा अनावर झाली नसेल? जरी ते युद्ध असलं तरी असं युद्ध धृतराष्ट्रानं कधी पाहिलंच नव्हतं, नव्हे संपूर्ण भारतवर्षानं कधी पाहिलं नव्हतं. धृतराष्ट्र तर अंध होता, पण त्यालाही तिथं काय चालू असेल याविषयी उत्कंठा होती.
* पंढरीच्या पांडुरंगाचं केवळ वर्णन ऐकून त्याला पाहण्याची ओढ संत ज्ञानेश्वरांमुळे निर्माण झाली. आणि हजारो भाविक त्याला पाहण्यासाठी प्रत्यक्ष पंढरपूरला दरवर्षी जाऊ लागले. आजही वारीची वर्णनं केवळ ऐकून समाधान होत नाही, तर प्रत्यक्ष वारी पाहण्यासाठी गर्दी जमते हा आपला अनुभव आहे. वारी आळंदीहून निघाली अशा बातम्या टी.व्ही.वर दाखवतात, प्रत्यक्ष पालखीही दाखवतात, काही लोक तिथूनच दर्शन घेतात, पण कित्येक लोक ती वारी केवळ दुरून का होईना पण स्वत: पाहण्यासाठी मार्गावर येतात आणि तो अद्भुतरम्य सोहळा अनुभवतात.
* निवडणुकीच्या काळात रोज अनेक पुढाऱ्यांच्या सभांचं थेट प्रक्षेपण वृत्त वाहिन्यांवरून सुरु असतं. मात्र तरीही आपल्या घराजवळच्या मैदानात एखाद्या बड्या राजकीय पुढाऱ्याची सभा असली की आपण आवर्जून जातो. का? वास्तविक त्या गर्दीत तो नेता आपल्याला दिसणारही नसतो. त्याचं सगळं बोलणं आपल्याला ऐकू येतंच असं नाही. त्याचं सगळं भाषण वाहिन्यांवर दिसणारही असतं, पण तरीही आपण जातोच.
* क्रिकेट हा तर आपला जीव की प्राण! सहसा भारताची मॅच आपण चुकवत नाही. पण तरीही प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी लाईव्ह मॅच स्टेडियम मध्ये बसून पाहण्याची इच्छा असते. का? वास्तविक ज्यांनी अशी मॅच पाहिली आहे त्यांना हे माहिती आहे की टि.व्ही. इतके तपशील तिथे कळत नाहीत. अनेक वेळी विकेट पडलेलीही समजत नाही! पण तरीही आपला अट्टाहास असतोच. आणि महागाचं तिकिट काढून मॅच पाहतो.
* ...
* ...
* ...
* अशी अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. माणूस प्रत्यक्ष पाहण्यासाठी धडपडतो. का? सगळं व्यवस्थित घरबसल्या दिसणार असूनही हा हट्ट का करतो? .... तर त्याचं खरं कारण आहे ... वातावरण अनुभवण्यासाठी!!! टिव्हीवर पाहून किंवा वर्णन ऐकून जे समाधान मिळत नाही ते प्रत्यक्ष तिथं उपस्थित राहून अनुभवल्यामुळे मिळतं. भव्य-दिव्य कार्यक्रम पाहण्याचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात क्वचितच येतात. नंतर फार तर आपण फोटो पाहू शकतो किंवा व्हिडियो. पण प्रत्यक्ष अनुभव नाही मिळवू शकत.
* पुण्याजवळ येत्या ३ जानेवारीला असाच एक भव्य-दिव्य ऐतिहासिक सोहळा होणार आहे. "मी तो सोहळा प्रत्यक्ष पाहिलाय" हे तुम्ही भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगू शकाल. ती संधी आत्ताच आहे. तेव्हा येत्या ३ जानेवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'शिवशक्ती संगम' या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहा.

No comments:

Post a Comment